पक्षाची विचारधारा अधिक बळकट करणार   

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन 

पुणे : लोकसभा निवडणूकीत पक्षाला फारसे यश आले नाही. तरी सुध्दा आम्ही अस्वस्थ झालो नाही. अधिक जोमाने राजकीय कार्याला सुरूवात करून जनतेच्या हितांच्या नवीन योजना आणल्या. त्यामुळे विधानसभेला पक्षाला चांगले यश आले. लाडकी बहिणीसारखी योजना आणून गरिब महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला मतदार पक्षासोबत जोडल्या गेले. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत.  दरम्यान, पक्षाची विचारधारा अधिक बळकट करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनिल तटकरे यांनी रविवारी केले. 
 
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय महिला पदाधिकार्‍यांची ’सशक्त संघटन’ कार्यशाळा नवले लॉन्स येथे पार पडली. त्यावेळी तटकरे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल, सुरेश घुले, प्रविण शिंदे, बाबा धुमाळ, राजेंद्र पवार आदींसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.  
 
पुढे तटकरे म्हणाले, सत्ता येते आणि जात राहते. मात्र, सत्तेच्या माध्यमातून जनतेचे हित जोपासणे महत्वाचे असते. प्रत्येक महिला पदाधिकार्‍यांनी जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्यतेने घेणे गरजेचे आहे. महिलांनी अधिक सतर्क राहून पक्षाचे काम करावे. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागते. तरच पक्ष अधिक मजबूत होत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पक्षासाठी अधिक मेहनत घेतली. त्यामुळेच पक्षाला विधानसभेला चांगले यश आले. महिला पदाधिकार्‍यांनी सुध्दा यापुढे अधिक जोमाने पक्षाच्या बळकटीसाठी कार्य करावे. महिलांनी कुठल्याही परिस्थितीत घाबरू नये, त्यांच्या पाठिशी मी स्वत: आणि अजितदादा उभे राहतील, असे  तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
’फुले-शाहू-आंबेडकर’ यांची विचारधारा घेऊनच पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. हीच विचारधारा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. महिला पदाधिकार्‍यांनी सुध्दा यांच्या विचारानेच पुढील वाटचाल करावी. पिवळा रंग हा राजकीय विचारधारेचा आहे. हीच विचारधारा पुढे महिला पदाधिकार्‍यांनी तेवत ठेवावी. जनतेच्या हिताचे कार्य करून महिलांनी राजकीय आयुष्य घडवावे. प्रत्येकाने अधिक ताकदीने लढून पक्ष संघटनेत पकड निर्मण करावी, असे देखील तटकरे यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन कविता आल्हाट यांनी केले.
 
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता 
 
गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक स्तरावर अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. निवडणुकीचा निर्णय न्यायालयाने अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र, येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर यादरम्यान निवडणूका जाहीर होतील, अशी अधिक शक्यता आहे, असे सुनिल तटकरे यांनी सूचक विधान केले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने पक्ष वाढीसाठी कार्य करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Related Articles